संकल्पांचा संकल्प करूया।


*संकल्पांचा संकल्प करूया!

सर्वप्रथम सर्वांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
*वर्ष २०१९ हे तुम्हाला सुखी,  समृद्धी, आरोग्यदायी जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना*

नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. अनेकांच्या नववर्षाच्या संकल्पांची यादीही तयार झाली असेल. हल्ली संकल्प करणं जणू एक प्रथाच झालीय. बऱ्याचदा हे संकल्प पूर्ण होत नाहीत आणि वर्षाअखेरीस केवळ विनोदाचे विषय बनतात. एका आकडेवारीनुसार केवळ 8 टक्के लोक त्यांचे नवीन वर्षाचे संकल्प पूर्ण करण्यात यशस्वी ठरतात. म्हणून आपला संकल्प पूर्ण व्हावा, असं तुम्हाला वाटत असेल तर खालील साध्या-सोप्या गोष्टी लक्षात ठेवा...

1) *छोटी सुरुवात* : आपण बऱ्याचदा स्वतःकडून खूप मोठमोठ्या अपेक्षा ठेवतो. नवीन वर्षात आपला एकदम कायापालट होणार आहे आणि आपण सगळं काही करू शकतो अशा भ्रमात राहून संकल्प केले जातात. याउलट छोटी, छोटी उद्दिष्टं समोर ठेवून पूर्ण केली तर तुमचा उत्साह वाढतो.

2) *स्पष्टता असू द्या* : आपण आपली उद्दिष्टं तर ठरवतो, पण अंमलबजावणीचा विचार मात्र करत नाही. संकल्प पूर्ण कसा करायचा, याचा तपशीलवार विचार करणे महत्त्वाचे असते. "मी यावर्षी नियमितपणे जीमला जाईन असं म्हणण्यापेक्षा मी मंगळवारी दुपारी आणि शनिवारी सकाळी जीमला जाईन," असं ठरवणं जास्त योग्य आहे.

3) *इतरांनाही सामावून घ्या* : संकल्प सिद्धीमध्ये सामाजिक बांधिलकीचा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो. आपल्या संकल्पाशी इतरही लोक जोडले आहेत, याचा विचार केला तर आपण अधिक जबाबदारीनं ठरवलेली गोष्ट पार पाडतो. त्यामुळंच तुम्ही ठरवलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठी इतरांनाही त्यामध्ये सहभागी करून घ्या.

4) *अपयशावर मात करा* : तुमच्या उद्दिष्टांचे नव्याने मूल्यमापन करा. आपल्याला नेमके काय अडथळे आले? त्यावर मात करण्यासाठी कोणता मार्ग अधिक परिणामकारक ठरेल? कितीही अवघड असला तरी आपल्या संकल्पांवर ठाम रहायचं असेल तर तुमची इच्छाशक्ती वाढवण्यासाठी नवनवीन पर्यायांचा अवलंब करा.

5) *उद्दिष्टांशी संकल्पांची सांगड घाला* :  भविष्यातली आपली उद्दिष्टं काय आहेत याचा विचार करून नवीन वर्षाचे संकल्प करावेत. म्हणजे तुम्हाला खेळात काही रस नसेल तर मी उत्तम धावपटू बनून दाखवेन असा संकल्प करण्यात काहीच अर्थ नाही. अशावेळी केवळ इच्छाशक्तीवर विसंबून काहीच होत नाही. त्यामुळेच तुमच्या आवडीनिवडी आणि करीअरचा विचार करुन संकल्प करणं केव्हाही चांगलं.

Comments

Post a Comment